मुंबई : वांद्रेस्थित हास्य कलाकार तरूणीच्या तक्रारीवरून तिच्या एका इन्स्टाग्राम फॉलोअरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरूणीचा समाज माध्यमांवर पाठलाग करायचा, तसेच त्याने तरूणीली भेटवस्तूही पाठवली होती. याशिवाय आरोपीने तिच्या वडिलांना ई-मेल पाठवला होता. वांद्रे पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

वांद्रे पाली हिल येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय हास्य कलाकार तरूणीचे इन्स्टाग्रामवर साडेचार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तक्रारीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी तिला शॉन डी. पिल्लई नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून विनंती आली होती. तिच्या चाहत्यांकडून नेहमी अशा रिक्वेस्ट येत असल्यामुळे तिने ती स्वीकारली. त्यानंतर इंस्टाग्राम वापरकर्ता नियमितपणे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाळत ठेऊन होता. दोन महिन्यांपूर्वी तक्रारदार तरूणीला वडिलांनी दूरध्वनी केला होता. त्यावेळी त्यांनी shawnpillai5@gmail.com या ई-मेल पत्त्यावरून नियमितपणे ई-मेल येत असल्याचे सांगितले. परंतु, तिच्या वडिलांनी त्या ईमेलकडे दुर्लक्ष केले.

हेही वाचा : प्रकल्पातील सुख सुविधा कधी मिळणार… करारातच संबंधित माहिती देणे आता बंधनकारक, महारेराचा निर्णय

२७ जुलैला खारघर येथे राहणाऱ्या तिच्या वडिलांना ॲमेझॉनवरून एक पार्सल आले. तिच्या वडिलांनी ते उघडले तेव्हा त्यांना आत एक लेडीज पर्स मिळाली. वडिलांनी तक्रारदार तरूणीला विचारले असता तिने अशा प्रकारे कोणतीही पर्स मागवली नसल्याचे सांगितले. काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने तक्रारदाराने तिच्या वडिलांचे ई-मेल खाते तपासले. त्यावेळी shawnpillai5@gmail.com या ई-मेल आयडीवरून अश्लील टिप्पणी करणारा मजकुर आल्याचे तिला समजले.

हेही वाचा : ‘टाटा कॅन्सर रुग्णालया’तील डॉक्टरांची निवृत्ती वय वाढविण्याची पंतप्रधानांकडे मागणी! एकाचवेळी आठ डॉक्टर होणार निवृत्त…

हा ईमेल वाचल्यानंतर तक्रारदार महिलेने वांद्रे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे आणि प्रसारित करणे) आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम ७८ (पाठलाग करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीने वापरलेल्या ई-मेलच्या माध्यमातून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यासाठी ई-मेल कंपनीशी संपर्क साधण्यात आला असून त्यावरून मिळालेल्या माहितीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.