मुंबई : नागरिकांना घराबाहेर पडून जरूर मतदान करा असे आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या ५ व्या टप्प्यातील मतदानासाठी सकाळपासूनच आपापल्या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हजेरी लावली होती. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये आपापल्या मतदार केंद्रांवर जाऊन नेते, अभिनेते, प्रशासकीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन क्लब हाऊस येथे कुटुंबियांसमवेत मतदानाचा अधिकार बजावला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी के. सी. महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही के. सी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. तर अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांनीही सोमवारी सकाळच्या सत्रात मतदान केले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी वांद्रे पूर्वेकडील नवजीवन शाळेतील मतदार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही मुलगा अर्जुनसह मतदार केंद्रावर जाऊन मतदान केले.

हेही वाचा…मुंबई : कार्यकर्त्यांचा दिवस धावपळीत; परिचित मतदारांशी संवाद, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य व खाण्यापिण्याची रेलचेल

टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष ८६ वर्षीय रतन टाटा यांनी कुलाबा येथील पत्तन प्राधिकरण येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध असतानाही रतन टाटा यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अंबानी यांनी सकाळीच कुलाबा येथील जी. डी. सोमाणी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान सुरू होण्यापूर्वीच अंबानी हे मतदान केंद्रावर दाखल झाले होते. सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचल्याने गर्दी कमी होती. तरीही अंबानी यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. रांगेत उभे असताना अंबानी यांनी इतर नागरिकांशी संवादही साधला. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि महिंद्रा ॲण्ड महिन्द्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही मुंबईत मतदार केंद्रावर जाऊन मतदान केले.

कलाकारांनीही मोठ्या संख्येने केले मतदान

गेले दोन दिवस सातत्याने मुंबईकरांना मतदानासाठी आवाहन करणारे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान, निवडणूक आयोगाने ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून ज्याची निवड केली तो अभिनेता राजकुमार राव याच्यासह बॉलीवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी सोमवारी सकाळी मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावणाऱ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव अग्रस्थानी असते. मात्र, यावेळी महानायक अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांनी सोमवारी दुपारी ४ नंतर जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांनीही दुपारी वांद्रे येथील माऊंट मेरी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी संध्याकाळच्या सुमारास वांद्रे पश्चिमेकडील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

हेही वाचा…मुंबई : मर्यादित वाहतूक सेवेमुळे मतदारांचे हाल

अक्षय कुमारने पहिल्यांदाच केले मतदान

सोमवारी सकाळी सकाळी जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारा अभिनेता अक्षय कुमार हा चर्चेचा विषय ठरला. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी उत्सूक असलेल्या अक्षयने सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. अभिनेता राजकुमार राव यानेही सकाळी वर्सोवा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्कही बजावला आणि लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी आवाहनही केले. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या जोडप्यानेही सोमवारी सकाळीच वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि अभिनेता शाहीद कपूर यांनीही सकाळीच मलबार हिल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ८८ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनीही सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

अभिनेत्री जान्हवी कपूरने सकाळीच वांद्रे येथील सेंट ॲन्स स्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेता मनोज वाजपेयी यानेही पत्नीसह वर्सोवा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शिल्पा आणि शमिता शेट्टी, प्रसिध्द गायक कैलाश खेर यांनीही वर्सोवा, अंधेरी येथे मतदान केले. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मुलगी अभिनेत्री भावना बलसावर हिच्यासह जुहूच्या गांधीग्राम येथील मतदान केंद्रावर मतदान केले. गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध असला तरी आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनाही घराबाहेर पडून मतदान करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान केले, अशी भावना शुभा खोटे यांनी व्यक्त केली. सकाळच्या सत्रात अभिनेता फरहान अख्तरने बहीण दिग्दर्शिका झोया अख्तर आणि आई हनी इराणी यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. प्रसिध्द गीतकार गुलजार यांनीही आपली मुलगी प्रसिध्द दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता वरुण धवन यानेही वडील दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याबरोबर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेत्री करीना कपूर खाननेही पती सैफ अली खानबरोबर वांद्रे पश्चिमेकडील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेता आमिर खान, दिग्दर्शिका किरण राव, अभिनेता अनिल कपूर, संजय दत्त, गोविंदा, परेश रावल, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेत्री तब्बू, सान्या मल्होत्रा, अनन्या पांडे आणि तिचे वडील अभिनेते चंकी पांडे, अभिनेत्री श्रिया सरन, आमिर खानची दोन्ही मुले इरा आणि जुनैद खान यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा…बीडीडीवासीय आणि वांद्रे वसाहतीतील रहिवाशांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठी कलाकारांनीही केले मतदान

प्रसिध्द अभिनेते अशोक सराफ, अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते विजय पाटकर, अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि त्यांची दोन्ही मुले अभिनय आणि स्वानंदी बेर्डे यांच्यासह स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, प्राजक्ता माळी, प्रिया बापट – उमेश कामत, मिलिंद गवळी, अभिजीत खांडकेकर, महाराष्ट्राची हास्यजत्रातील प्रसिध्द कलाकार समीर चौगुले, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेत्री-निर्माती मनवा नाईक, अदिती सारंगधर, स्पृहा जोशी, सायली संजीव, वीणा जामकर, हेमांगी कवी अशा मराठीतील अनेक मान्यवर कलाकारांनीही मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai celebrities voted with great enthusiasm mumbai print news psg
Show comments