मुंबई : सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक मुंबईकर गोव्याला जातात. या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई – थिवी, पनवेल – करमळी या दरम्यान २८ विशेष फेऱ्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रात्री १२.२० वाजता गाडी क्रमांक ०११५१ दैनिक विशेष रेल्वेगाडी (१२ फेऱ्या) सुटेल आणि थिवि येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. तसेच याच काळात दुपारी ३ वाजता थिवि येथून गाडी क्रमांक ०११५२ दैनिक विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ३.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असून एक वातानुकूलित द्वितीय, तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशी या रेल्वेगाडीची संरचना असेल.

हेही वाचा : Video: “माझ्या आजोबांना…”, आदित्य ठाकरेंची गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही फोटो काढले आणि…!”

पनवेल – करमळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) ४ फेऱ्या

गाडी क्रमांक ०१४४७ विशेष २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४८ विशेष गाडी २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून निघेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २२ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, ४ वातानुकूलित तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी अशी तिची संरचना असेल. मुंबई – थिवी, पनवेल – करमळी विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार असून, २१ नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट आरक्षण सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai central railway special trains from mumbai to goa will run ahead of new year mumbai print news css