मुंबई : चौपाटीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या २१ वर्षीय आरोपीला १२ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलीचा आरोपीने विनयभंग केला होता. या घटनेनंतर मुलगी घाबरली होती. तिने नुकतीच जुहू पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) बुधवारी रात्री गुन्हा दाखल होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ वर्षांची तक्रारदार तरूणी शिक्षण घेत असून तक्रारीनुसार पीडित मुलगी व तिची मैत्रिण ८ ऑगस्ट रोजी चौपाटीवर फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी नोवाटेल चौपाटी ते आनंदा कॅफेदरम्यान एक अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत होती. त्यामुळे दोघीही घाबरल्या. अखेर आरोपीने जवळ येऊन पीडित मुलीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पीडित मुलगी व तिची मैत्रिण घाबरली. त्यामुळे त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही. अखेर पीडित मुलीने जुहू पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दोन मुलींचा पाठलाग करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८ सह पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला होता.

हेही वाचा : अभिमत विद्यापीठातून डॉक्टर होण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, राज्यातील बहुतेक अभिमत विद्यापीठात वैद्यकीय पदवी शिक्षणाचे शुल्क कोटींच्या घरात

याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पोलीस पथकाला तात्काळ आरोपीचा शोध घेण्याची सूचना केली. संशयीत आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव सोहन विष्णूदेव पासवान (२१) असून त्याला गुन्हे शाखेच्या कक्षात आणल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्यानुसार त्याला जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जुहू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुळचा बिहारमधील मोतीपूर येथील रहिवासी आहे. तो मुंबईत छोटी मोठी कामे करतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai chaser of the two girls who went to the chowpatty was arrested within 12 hours mumbai print news css