मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरुवारी विविध शाळा, महाविद्यालये आणि संस्थातर्फे सांस्कृतिक व साहित्याशी निगडित निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच वेळी गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी सूर्योद्यापासून ते सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सूर्यास्तापर्यंत सलग १ हजार १२ मराठी गीतांची शृंखला सादर करण्यात आली. शिशु वर्गापासून इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद या उपक्रमात सहभागी झाला होता. चिमुकल्यांनी सादर केलेली बडबडगीते आणि विद्यार्थी, शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी दाद दिली. गिरगावसह आसपासच्या परिसरातील कलावंत मंडळींनी शाळेला भेट देऊन या उपक्रमाला दाद दिली.

गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण १ हजार १२ जणांनी वैयक्तिकरित्या सूर्योद्यापासून सूर्यास्तापर्यंत सलग मराठी गीते सादर केली. यामध्ये विविध काळातील मराठी चित्रपट व नाट्यगीतांचा समावेश होता. याचबरोबर अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आदी मराठी गीते सादर करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धतेने रंगमंचावर गीत सादर केले. यावेळी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत होते. सकाळपासून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. संपूर्ण शाळेमध्ये यानिमित्त सजावट देखील करण्यात आली होती. सजावटीमध्ये कागदी मुळाक्षरे, ज्ञानपीठ विजेते मराठी साहित्यिकांचे फोटो देखील लावण्यात आले होते. पुस्तकांच गाव असलेल्या भिलार गावाचा देखावा देखील उभारण्यात आला होता. मराठी साहित्यिकांची काही पुस्तके देखील ठेवण्यात आली होती.दरम्यान, या कार्यक्रमाची कल्पना ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला देण्यात आली असून यावेळी त्यांचे प्रतिनिधी शाळेत उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या दृष्टीने शाळेत जय्यत तयारी सुरू होती. मराठी गीतांचा सातत्याने सराव केला जात होता. तसेच या कार्यक्रमाची सलग तब्बल १२ तासांहून अधिक वेळ रंगीत तालीमही करण्यात आली होती, अशी माहिती शाळेतील शिक्षक नारायण गिते यांनी दिली. चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. सलग १ हजार १२ मराठी गीतांचे सादरीकरण हा त्यापैकीच एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

Story img Loader