मुंबई : मुंबईला भेट देणाऱ्या देश-विदेशांतील पर्यटकांसाठी शहर आणि उपनगरांतील समुद्रकिनारे आकर्षण ठरत आहेत. यातील आठ समुद्रकिनारे धोकादायक ठरले आहेत, तर केवळ दोनच किनारे पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील १२ पैकी गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे शासननिर्णय आणि महापालिकेच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. गिरगाव चौपाटी सार्वजनिक पोहण्यासाठी आणि जलक्रीडेसाठी सुरक्षित क्षेत्र मानले जाते. तर जुहू चौपाटीवरील वायसीएमए ते रुईया पार्कदरम्यानचा भाग पोहण्यासाठी सुरक्षित मानला जातो.
स्थानिक, तसेच देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने या धोकादायक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी जात असल्याचे उघड झाले आहे. मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस दलासमोरील आव्हान वाढले आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दलाने सहा समुद्रकिनाऱ्यांवर १११ जीवरक्षक तैनात केले आहेत.
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्हसह इतर समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना ओढ असते. मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईतील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. मुंबईला सुमारे १२ समुद्रकिनारे (चौपाट्या) आहेत.
गिरगाव, वाळकेश्वर-वरळी, दादर, माहीम, वांद्रे ते खार, जुहू, आक्सा (दानापानी), मनोरी, गोराई, मार्वे, टाटा गार्डन बी. डी. रोड आणि राजभवन या १२ ठिकाणी समुद्रकिनारे लाभले आहेत. मात्र १२ पैकी केवळ दोन समुद्रकिनारे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. राजभवन किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे. तर टाटा गार्डन बी. डी. रोड किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी आहे.
पर्यटकांना मज्जाव
सहा किनाऱ्यांवर १११ जीवरक्षक तैनात काही वर्षांपूर्वी शासन निर्णयानुसार मुंबईतील १२ पैकी आठ समुद्रकिनारपट्ट्या असुरक्षित जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र दादर, आक्सा (दानापानी), गोराई या समुद्रकिनारपट्ट्यांवर पर्यटकांचा ओघ कायम असतो. त्यामुळे यंत्रणांना कायमच सतर्क राहावे लागत आहे. मुंबई अग्निशमन दलाने गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा समुद्रकिनाऱ्यांवर १११ जीवरक्षक तैनात केले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षारक्षक समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. समुद्राला भरती सुरू होताच पर्यटकांना पाण्यात उतरण्यास मज्जाव करण्यात येतो. मात्र काही वेळा अतिउत्साही, हुल्लडबाज पर्यटकांमुळे जीवरक्षकांना निरनिराळ्या समस्यांनाही सामोरे जावे लागते.
हेही वाचा : मुंबई एमएमआर ग्रोथ हबमध्ये जम्बो गृहबांधणी… ३० लाख घरांचे उद्दिष्ट कोण, केव्हा, कसे पूर्ण करणार?
खडक, अतिजलद प्रवाह
● वाळकेश्वर-वरळी, दादर, माहीम, वांद्रे ते खार, आक्सा (दानापानी), मनोरी, मार्वे आणि गोराई या समुद्रकिनारपट्ट्या धोकादायक श्रेणीत आहेत. वाळकेश्वर-वरळी किनारपट्टी खडकाळ, दादर किनारपट्टी खडकाळ आणि प्रदूषणयुक्त पाण्यामुळे असुरक्षित आहे.
● माहीम किनारपट्टी जलनिस्सारणामुळे, तर वांद्रे ते खारदरम्यानची किनारपट्टी खडकाळ असल्याने असुरक्षित आहे. आक्सा (दानापानी) अतिजलद प्रवाह, मार्वेमध्ये पाण्याखाली जलद प्रवाह असल्याने, तर मनोरी आणि गोराई किनारपट्ट्या जलद खळखळणाऱ्या पाण्यामुळे असुरक्षित आहेत.
असुरक्षित किनारे
● वाळकेश्वर-वरळी
● दादर माहीम वांद्रे ते खार आक्सा (दानापानी) मनोरी मार्वे गोराई