मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात नेमलेल्या क्लीनअप मार्शलनी वर्षभरात ५ कोटी रुपये दंड वसूल केला. सर्वाधिक दंड वसुली चर्चगेट, बोरिवली, दादर, गोवंडी, वांद्रे या परिसरातून करण्यात आली आहे. मात्र नियमानुसार या दंड वसुलीपैकी ५० टक्केच रक्कम मुंबई महापालिकेला मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० क्लीन अप मार्शल याप्रमाणे संपूर्ण मुंबईसाठी मार्शल नेमले होते. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर स्नान करणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा प्रत्येक चुकांसाठी हे क्लीन अप मार्शल नागरिकांकडून २०० रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करीत होते. मात्र क्लीन अप मार्शलची सेवा ४ एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. क्लीन अप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनामुळे हा निर्णय घेतला आहे.
मुलुंडमध्ये सर्वात कमी वसुली
गेल्या वर्षभरात क्लीन अप मार्शलनी ५ कोटी ६ लाख रुपये दंड वसुली केली आहे. चर्चगेट, कुलाबा, बोरिवली, मानखुर्द, गोवंडी, दादर, माहीम, वांद्रे या परिसरातून सर्वाधिक वसुली करण्यात आली आहे. तर सर्वात कमी कारवाई आणि वसुली मुलुंड, भांडूप, गोरेगाव, चेंबूर या भागात झाली आहे.
शेवटच्या दिवसापर्यत कारवाई
एकूण १२ विविध संस्थांचे १२५० क्लीन अप मार्शल मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी नेमण्यात आले होते. या क्लीन अप मार्शलनी वर्षभरात १ लाख ७५ हजाराहून अधिक प्रकरणात ५ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. ४ एप्रिलपासून ही सेवा बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी अखेरच्या दिवसापर्यंत दंडात्मक कारवाई सुरू होती. तर वडाळा, चेंबूर, मुलुंड, भांडूपमध्ये शेवटच्या दिवशी कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नाही.
पालिकेला अर्धा महसूल
वसूल केलेल्या दंडापैकी ५० टक्के रक्कम क्लीन अप मार्शलचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला, तर ५० टक्के रक्कम पालिकेला मिळते. त्यामुळे या दंडात्मक कारवाईतील सुमारे अडीच कोटी मुंबई महानगरपालिकेला मिळणार आहेत.
तक्रार आणि मदतीसाठी हेल्पलाईन सेवा
क्लीन अप मार्शलकडून ४ एप्रिल २०२५ नंतर दंड आकारणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाच्या ०२२ – २३८५५१२८ आणि ०२२ – २३८७७६९१ (विस्तारित क्रमांक ५४९/५००) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण प्रकरणे – १ लाख १२ हजार
दंड वसुली – ५ कोटी ६ लाख रुपये