मुंबई : कडक उन्हाच्या काहिलीत थंडावा मिळविण्यासाठी शहाळ्याच्या पाण्याला मागणी वाढली आहे. मात्र, आवक घटल्याने शहाळ्याच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली. परिणामी, एका शहाळ्यासाठी ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत.
आरोग्यवर्धक शहाळ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनाने उष्म्याशी निगडीत आजार बरे होतात. रुग्णांना शहाळ्याचे पाणी देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे शहाळ्यांना शहरात वर्षभर चांगली मागणी असते. मात्र, हवामान बदलामुळे शहाळ्याची आवक कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हेही वाचा : राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”
रेल्वे स्थानके, बाजारपेठा आणि कार्यालये आदी परिसरात मोठ्या प्रमाणात शहाळ्यांचे विक्रेते दृष्टीस पडतात. उन्हाळ्यात शितपेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचप्रमाणे लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे किंवा फळांच्या रसाने तहान शमविण्याची संख्याही अधिक आहे. मात्र, आरोग्यवर्धक अशा शहाळ्याला मुंबईकर पसंती देत आहेत.
हवामान बदलामुळे त्याची आवक कमी झाली आहे. परिणामी, शहाळ्याची किंमत २० ते २५ रुपयांनी वाढली आहे. केरळ, आंध्र प्रदेश येथून मुंबईत मोठ्या प्रमाणावर शहाळ्याची आवक होते. मात्र गेले काही दिवस आंध्र प्रदेश, केरळ येथील शहाळी आणि नारळांची आवक कमी झाल्याचे नारळ विक्रेते महेश भानुप्रताप यांनी सांगितले.
हेही वाचा : भाभा रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार
दर असे…
काही दिवसांपूर्वी ४५ ते ५५ रुपयांना मिळणारे शहाळे आता ६० ते ८० रुपयांना विकले जात आहे. तसेच १० ते १५ रुपयांना मिळणारे छोटे नारळ २० ते २५ रुपयांना मिळत आहेत. मध्यम आकाराचे २५ रुपयांना मिळणारे नारळ सध्या ३० ते ३२ रुपयांना मिळत आहेत.