मुंबई : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर मुंबईमध्ये थंडी परतली असून रविवारी किमान तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सोमवारी पहाटे गेल्या नऊ वर्षांतील डिसेंबरमधल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांताक्रूझमध्ये सोमवारी तापमापकाचा पारा १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. रविवारच्या तुलनेत त्यात ३.५ अंशांची घट झाली असून किमान तापमानाच्या सरासरीपेक्षा ते ५.१ अंशानी कमी आहे. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये ११.४ अंश सेल्सिअस या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. डिसेंबरमधील सर्वात जास्त किमान तापमान २०२२ मध्ये २५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. कुलाबा केंद्रात नोव्हेंबर महिना किमान तापमान २०-२५ अंशांच्या दरम्यान राहिले. सोमवारी पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतही पारा २० अंशांखाली जाऊन १९.२ अंश तापमानाची नोंद झाली. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उपनगरांपेक्षा दक्षिण मुंबईत तापमान काहीसे जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हे ही वाचा… मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

नाशिक १० अंशांखाली

नाशिकमध्ये सोमवारी राज्यातील सर्वांत कमी, ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पुणे येथे १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्यामुळे राज्यात गारठा वाढू लागला असून येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai coldest december in nine years asj