मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत आहेत. तसेच करोना विषाणूच्या जेएन. १ या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कृतीदलाची पुनर्रचना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृतीदलाच्या अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम हे सदस्य आहेत. आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असतील.

हेही वाचा : मुंबई: हॉटेलच्या वाहन चालकाने केली मोटरीतून दागिन्यांची चोरी; संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश; आरोपीला अटक

गंभीर व अतिगंभीर आजारी करोना रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन नियमावली तयार करणे, करोना क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीर आजारी करोना रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी उपचारांबाबत मार्गदर्शक सूचना देणे अशा कृतीदलाच्या जबाबदाऱ्या असतील, असे आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai covid task force formed again as number of covid jn 1 patients increasing in state mumbai print news css