मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दूरध्वनी करून दिल्लीला जाणारे विमान थांबवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्या महिलेविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेने दोन वेळा दूरध्वनी केल्याचा संशय आहे. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विमानतळावरील संयुक्त नियंत्रण केंद्रात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या प्रीती मजवेलकर (४४) यांनी याप्रकरणी सहार पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सहार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५२ (४) व ३५३ (१) (ब) अंतर्गत अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री विमानतळावरील सेवा क्रमांकावर एका महिलेचा दूरध्वनी आला होता. त्या महिलेने मुंबहून जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. दिल्लीला जाणाऱ्या विमान थांबवा. विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण ही माहिती देत असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर विमानतळावर सुरक्षा बैठक घेऊन विमानाची पाहणी करण्यात आली. मात्र तपासणीत काहीच सापडले नाही. त्यानंतर महिलेने पुन्हा दूरध्वनी करून विमान दिल्लीला रवाना झाले का, अशी विचारणाही केली होती. सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : मेट्रो ४ : कापूरबावडी येथे चार तुळई बसविण्यात एमएमआरडीएला यश, प्रत्येकी १०० टनाच्या तुळई आठ तासांत बसविल्या

विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्टोबरपासून देशातील सर्वच विमानतळांवर, तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश प्राप्त होत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात धमक्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. बहुतांश संदेश समाज माध्यमांवरून पाठवण्यात आले असून विमान कंपन्या, स्थानिक पोलीस, विमानतळ प्राधिकरण यांना ई-मेल अथवा संदेश पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ नवीन धमक्या आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. प्रत्येक विमानाची व प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : झोपु प्राधिकरणाच्या घरभाडे व्यवस्थापन प्रणालीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव, प्रणालीस ‘स्कॉच सुवर्ण गौरव’ पुरस्कार प्राप्त

समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात आलेल्या या धमक्यांमुळे देशभारातील ५१० उड्डाणांवर परिणाम झाला आहे. महिन्याभरात सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबईत याबाबत १६ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा, प्रवासी व विमान कंपन्या सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागले. विशेष करून या धमक्यांमुळे विमान कंपन्यांच्या खर्चातही किमान २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नेहमीच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांचे काम अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

Story img Loader