मुंबई : दिल्लीवरून मुंबईला येणाऱ्या विमानात प्रवाशाने धुम्रपान केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी विमानातील कर्मचाऱ्यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी हवाई सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विमान कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

तक्रारीनुसार, विमानात व्यवस्थापक (इनफ्लाईट मॅनेजर) पदावर कार्यरत असलेल्या २९ वर्षीय कृतीका कुणवर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. विमानातील ११ बी क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या प्रवासी शुभांकर शर्मा याला विमानातील शौचालयात धुम्रपान करताना पकडण्यात आले. तक्रारदार कृतिका ही यापूर्वी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या क्यूपी ११२७ क्रमांकाच्या विमानावरही कार्यरत होत्या. त्यानंतर दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या क्यूपी ११२८ क्रमांवर विमानावर त्या कार्यरत होत्या. या विमानात त्याच्यासोबत जामी कुरेशी, वैष्णवी काकडे आणि दीप्तीशिखा भौमिक या देखील कार्यरत होत्या.

उड्डाणादरम्यानच धूम्रपानाचा प्रकार

दिल्लीवरून मुंबईच्या प्रवासादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता विमान आकाशात असताना स्वच्छतागृहाचा स्मोक डिटेक्टर अलार्म वाजत असल्याचे जामी कुरेशी यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वच्छतागृहाच्या दरवाजावर ठोठावले असता काही वेळाने एक प्रवासी बाहेर आला. त्यांनी शौचालयात पाहिले असता धूर झाल्याचे निदर्शनास आले. विमान कर्मचाऱ्यांनी विचारले असता त्या प्रवाशाने धूम्रपान केल्याची कबुली दिली. कृतीका यांनी सिगारेटबाबत विचारणा केली असता प्रवाशाने हिरव्या रंगाचा लायटर दिला. तो कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतला. त्याचा बोर्डिंग पास तपासला असता त्याचे भाव शुभांकर शर्मा असल्याचे समजले.

विमान कंपनीची प्रवाशावर कारवाई

यासंदर्भात वैमानिक पंकज निवास यांना माहिती देण्यात आली. विमान कंपनीच्या नियमानुसार, विमान कर्मचाऱ्यांनी पॅसेंजर नोटिफिकेशन वॉर्निंग कार्ड आणि “अनियंत्रित प्रवासी अहवाल” भरून त्यावर शिभंकर शर्माची स्वाक्षरी घेतली. त्यांनी केलेले कृत्य विमान प्रवासी नियमांनुसार गुन्हा असल्याचे प्रवाशाला सांगण्यात आले.

मुंबईत पोहोचताच गुन्हा दाखल

विमान सायंकाळी ६.२० वाजता मुंबई विमानतळावर उतरले. त्यावेळी विमान कर्माचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती विमानतळ सुरक्षा पथकाला दिली. त्यानंतर शुभांकर शर्माला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरोधात कृतीका कुणवर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विमानातील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हवाई वाहतूक नियमांनुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.