मुंबई : सर्वसामान्य गोविंदा पथकांना योग्य तो मानसन्मान मिळावा तसेच त्यांची अधिकृत सभासद म्हणून नोंदणी व्हावी, कारभारात पारदर्शकता यावी आदी बाबींवरून गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये काही दिवसांपासून खटके उडत होते. अखेर मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील गोविंदा पथकांनी एकत्र येऊन दहीहंडी समन्वय समितीशी काडीमोड घेत दहीहंडी असोसिएशन, महाराष्ट्र या नव्या संघटनेची स्थापना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहीहंडी उत्सव साजरा करताना होणारे अपघात, मृत गोविंदांच्या कुटुंबियांना मदत करता यावी तसेच राज्य सरकार, महानगरपालिका व आयोजकांबरोबर समन्वय साधता यावा यासाठी दहीहंडी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, गतवर्षी विविध कारणांमुळे दहीहंडी समन्वय समिती आणि गोविंदा पथकांमध्ये निरनिराळ्या मुद्द्यांवरून खटके उडू लागले होते. गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समिती सदस्यांमधील वाद विकोपाला गेला होता. अखेर बहुसंख्य गोविंदा पथकांनी एकत्र येऊन दहीहंडी असोसिएशन, महाराष्ट्र या नव्या संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या स्थापनेची घोषणा शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. भविष्यात दहीहंडी उत्सवात एकही अपघात घडू नये यादृष्टीने पावले उचलण्याचा संकल्प गोविंदा असोसिएशनने सोडला आहे, असे दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : मु्ंबई: भाडे थकबाकीदार विकासकांना यापुढे झोपु प्राधिकरणाचे दरवाजे बंद!

दहीहंडी असोसिएशनमध्ये नऊ जिल्ह्यांतील सुमारे २१० गोविंदा पथके सहभागी झाली आहेत. यात, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, सांगली, नाशिक या जिल्ह्यांतील गोविंदा पथकांचा समावेश आहे. दरम्यान, या संघटनेची सदस्य संख्या २१० इतकी असून लवकरच सदस्य संख्येत वाढ होईल, असा विश्वास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दहीहंडी असोसिएशन, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी अरुण पाटील यांची, कार्याध्यक्षपदी जय जवान गोविंदा पथकातील विजय निकम यांची, उपाध्यक्षपदी ठाण्यातील गोविंदा पथकाचे समीर पेंढारी यांची, तर सरचिटणीसपदी डोंगरी परिसरातील यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे कमलेश भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला सभासदपदी जोगेश्वरी येथील जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकच्या हर्षाली राणे, वडाळा येथील श्री गणेश मुलींचा गोविंदा पथकाच्या राणी देवकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : “उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन आणि…”; दीपाली सय्यद यांचा मनसे कार्यकर्त्यांना टोला

‘समन्वय समितीतील काही सदस्यांचा मनमानी कारभार सुरू होता. सर्व कारभार पारदर्शक व्हावा आणि सर्वसामान्य गोविंदांना न्याय मिळावा यासाठी दहीहंडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. दहीहंडी असोसिएशनमध्ये राज्यभरातील सर्वच गोविंदा पथकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मि‌ळेल’, असे दहीहंडी असोसिएशन, महाराष्ट्रचे सरचिटणीस कमलेश भोईर यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai dahihandi association is formed for govinda squads mumbai print news css