मुंबई : मध्य रेल्वेवरील शीव स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन शीव उड्डाणपुलाचे पाडकाम बराच काळापासून रखडले असून पाडकामांसाठी अनेक तारखा निश्चित करण्यात आल्या. आता होळी, धुळवडीनंतर २७ मार्च रोजी रात्रीपासून शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून त्यानंतर मध्य रेल्वे पुलाचे पाडकाम हाती घेणार आहे.
हेही वाचा : मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक अपघात…
सप्टेंबर २०२३ मध्ये अनंत चतुर्दशीनंतर जीर्ण शीव उड्डाणपुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार होते. त्यानंतर पुलाच्या पाडकामासाठी २० जानेवारी २०२४ हा दिवस निश्चित करण्यात आला होता. या पुलाचे पाडकाम केल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून पाडकाम २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुढे ढकलले. परंतु, इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले. आता २४ मार्च रोजी होळी, २५ मार्च रोजी धुळवड असून २६ मार्च रोजी इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर आहे. त्यानंतर २७ मार्च रोजी रात्रीपासून शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या पुलाचे पाडकाम २८ मार्च पासून हाती घेण्यात येणार आहे.
शीव उड्डाणपूल २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाचे पाडकाम सुरू होईल.
डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे