मुंबई : समाजमाध्यमांवर महिलांसोबत मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे पतीला पाठवण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या एका आरोपीला देवनार पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. अस्लम खान (२५) असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. गोवंडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका महिलेला काही महिन्यांपूर्वी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक संदेश आला होता.
महिलेने त्याला उत्तर दिले. त्यानंतर उभयतांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला मोबाइलवरून व्हिडीओ कॉल केला आणि तिची काही अश्लील छायाचित्रे तयार केली. त्यानंतर काही दिवसांतच आरोपीने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर छायाचित्रे समाजमाध्यमांवर, तसेच पतीला पाठवण्याची धमकी त्याने दिली.
हेही वाचा : महाराष्ट्रातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करणार, मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
महिलेने याबाबत देवनार पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या मोबाइल क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधून काढला. मात्र आरोपी गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये फिरत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राजस्थानमधील भिलवाडा येथे आरोपी असल्याची माहिती देवनार पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांकडून पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.