मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राझिलियन महिलेला अटक केली असून ती सुमारे ११ कोटी रुपये किमतीचे कोकेन भारतात तस्करी करून आणण्याचा प्रयत्न करीत होती. कोकेन असलेल्या सुमारे १०० कॅप्सूल तिच्या पोटातून काढण्यात आल्याचे डीआरआयकडून रविवारी सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक ब्राझिलियन नागरिक भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआय- मुंबईच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच एका महिला प्रवाशाला अडवले. ती साओ पाओलोहून मुंबईला आली होती. ताब्यात घेतल्यानंतर महिलेकडे अमली पदार्थांबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा तिने अमली पदार्थ असलेले कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. यानंतर, तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिने गिळलेल्या १०० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. त्यामध्ये एकूण १०९६ ग्रॅम कोकेन होते. त्याची किंमत १० कोटी ९६ लाख रुपये आहे, असे डीआरआयने सांगितले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अंतर्गत कोकेन जप्त करण्यात आले आणि सदर विदेशी महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत डीआरआय तपास करीत आहे. तिच्याकडून एक व्यक्ती अमली पदार्थ स्वीकारणार होता. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनचा साठा अधिक असल्यामुळे तिच्याविरोधात दाखल गुन्हा सिद्ध झाल्यास महिलेला २० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मुंबई व दिल्लीतील येणाऱ्या हेरॉइन व कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधीक आहे. उच्चभ्रू घरातील तरूण, कॉर्पोरेट, मोठे व्यावसायिक आदींकडून कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रीकी देशांतून कोकेनची सर्वाधीक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमधील नागरिकांचा वापर करण्यात येत होता. पण सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर करण्यात येत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई व मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन येते. साओ पावलो येथूनही मोठ्या प्रमाणत कोकेनची तस्करी होते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी हे तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करतात.