मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक लाख १२ हजार ७२ कामगार – वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ९८ हजार ६८० कामगार – वारस पात्र ठरले आहेत. तर अद्यापही ३८ हजार कामगार – वारसांच्या कागदपत्रांची मुंबई मंडळाला प्रतीक्षा आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. यातील एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती झालेली नाही. असे असताना आता सोडतीआधीच या अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. यासाठी म्हाडाने १४ सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामागरांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. कामगार विभाग गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता निश्चिती करीत आहे. या अभियानाला म्हाडाकडून अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता राज्य सरकारने लवचिक भूमिका घेत शेवटच्या कामागराची कागदपत्रे सादर होईपर्यंत ते जमा करण्याची मुभा दिली आहे.
आतापर्यंत, १४ सप्टेंबर ते २६ जुलै या कालावधीत एक लाख ५० हजार ४८४ पैकी एक लाख १२ हजार ७२ कामगार-वारसांनी कागदपत्र जमा केली आहेत. यापैकी १० हजार ३८३ कागदपत्रे ऑफलाईन जमा झाली आहेत. तर एक लाख एक हजार ६८९ अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. कागपत्र जमा करणाऱ्या एकूण एक लाख १२ हजार ७२ पैकी आतापर्यंत ९८ हजार ६८० कामगार – वारस पात्र ठरल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. तर १० हजार ६०८ कामगार अपात्र ठरले आहेत. त्याचवेळी दोन हजार ७८४ कामागरांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे.
हेही वाचा : कारण राजकारण: ‘मातोश्री’च्या अंगणात जागावाटपाचे त्रांगडे
दरम्यान, मेमध्ये एक लाख ११ हजार ६४८ कामगारांनी कागदपत्रे जमा केली होती. पावणेतीन महिन्यांत केवळ ४२४ अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे या मोहिमेचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. त्यात अजूनही ३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.