मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री बसण्याची वेळ आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात शैक्षणिक २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ५ हजार रुपयांनी आणि पी. एचडी.च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ६ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पर्यंत ५ हजार ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते. आता ते १० हजार ५०० रुपये करण्यात आले आहे, वसतिगृहात राहणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात ५ हजार रुपयांनी म्हणजेच ९०.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, पी. एचडी.च्या विद्यार्थ्यांकडून ५ हजार ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये ६ हजार रुपयांनी म्हणजेच १०९.०९ टक्क्यांनी वाढ करून प्रवेश शुल्क ११ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. वसतिगृहातील अतिथी खोलीसाठीच्या रक्कमेमध्येही वाढ करण्यात आली असून आता मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांना ३०० व इतर विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांना ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी वसतिगृहातील अतिथी खोलीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. वसतिगृह प्रवेश शुल्क वाढ ही मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसर आणि कलिना संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. वसतिगृहातील अस्वच्छता आणि गैरसोयींसंदर्भातील प्रकरणे वारंवार समोर येत असताना प्रवेश शुल्क वाढ निरर्थक आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून विद्यापीठाने प्रवेश शुल्क वाढ करण्यापेक्षा वसतिगृहांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. वसतिगृह प्रवेश शुल्क वाढीविरोधात ‘छात्र भारती’ या विद्यार्थी संघटनेने मंगळवारी (६ ऑगस्ट) कलिना संकुलात आंदोलन करीत निषेध केला.

हेही वाचा : अभियांत्रिकीची पहिली प्रवेश यादी १४ ऑगस्टला

‘वसतिगृह प्रवेश शुल्कात झालेली वाढ ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. हा आर्थिक भुर्दंड आहे. तळागाळातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठात पी.एचडी. करण्यासाठी येत असतात. त्यांना फेलोशिप मिळत नाही. त्यामुळे इतर खर्च खूप असतो. शुल्क वाढीमुळे खर्चाचा मेळ बसविणे अवघड होणार आहे. अतिथी खोलीसाठी करण्यात आलेली शुल्कवाढही अयोग्य आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध निधींची तरतूद असते, त्याचा योग्य वापर करून शुल्क वाढ कमी करावी’, असे मुंबई विद्यापीठात पी. एचडी. करणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

‘मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारे बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने टप्प्याटप्प्याने वसतिगृह प्रवेश शुल्कात वाढ करावी, दुप्पट शुल्क वाढ करणे हे अत्यंत चुकीचे असून बेकायदेशीर आहे. वसतिगृह शुल्कासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय न झाल्यास ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांच्या इमारत पाडकामाला स्थगिती!

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने गेल्या १७ वर्षांपासून वसतिगृह प्रवेश शुल्कात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. २००८ पासून वसतिगृह प्रवेश शुल्क ५ हजार ५०० रुपये होते. महागाई आणि वाढत्या खर्चामुळे प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai double hike in mumbai university hostel admission fee students upset over university s decision mumbai print news css