मुंबई : दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. याप्रकरणी झवेरी बाजार, वर्सोवा व मुंबादेवी परिसरात डीआरआयने छापे टाकून १४ किलो ४९७ ग्रॅम सोने, दोन कोटी रुपयांची रोख व ४६०० पाऊंड जप्त केले आहेत.
हे टोळके दोन ते तीन हजार रुपये प्रतिकिलो कमिशनवर तस्करी करून भारतात आणलेल्या सोन्याची कमी दरात विक्री करायचे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वा आठ कोटी रुपये आहे. या प्रकरणात सहभागी एका महिलेसह दुबईतील मुख्य आरोपीची माहितीही डीआरआयला मिळाली आहे.
मोहम्मद रफीक रझवी (५८), महेंद्र जैन (५२) व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला (५६), उमेद सिंह (२४) व महिपाल व्यास (४२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर मर्चंट हा सोन्याच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. ही तस्करी बटाटावालाच्या माध्यमातून करण्यात यायची. त्यानंतर भारतीय बाजारात वितरण करण्यासाठी ते सोने रझवीला देण्यात यायचे. ही विक्री माझगाव येथील दलाल महेंद्र जैन यांच्या मार्फत केली जायची. त्याबाबत डीआरआयचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून तपास करत होते. झवेरी बाजार येथील दोन ठिकाणांवरून हा व्यवहार चालतो, असे डीआरआयला समजले. त्यानुसार डीआरआयने विठ्ठलवाडी रोडवरील दुकानात छापा टाकला. त्यात १० किलो सोने सापडले.
हेही वाचा : ९ तारखेचा वायदा! भाजप ३०, मित्र पक्षांना १८ जागा?
दुबईतून आवक
जप्त करण्यात आलेले सोने दुबईतील अमजद नावाची व्यक्ती भारतात पाठवायची. त्यानंतर समीर मर्चंट व त्याची पत्नी ज्योती किट्टी हे सोने या टोळीतील इतर सदस्यांना विक्रीसाठी द्यायचे. मर्चंटला यापूर्वी १९९७ मध्ये डीआरआयने हाँगकाँगवरून परदेशी चलन आणल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्याला अहमदाबाद एनसीबीने अटक केली होती. २०१३ मध्ये बाहेर आला. त्याने अफजल बटाटावालावरून समीर मर्चंट असे नाव बदलले होते.