मद्यधुंद महिलेने गुरुवारी विलेपार्ले विमानतळ रिक्षा थांबा व विमानतळ पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. महिलेने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिला सुरक्षा रक्षकाच्या हाताचा चावाही घेतला. याप्रकरणानंतर महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपाली जीतेंद्र कुमार (३४) असे आरोपी महिलेचे नाव असून, ती दिल्लीतील रहिवासी आहे. विमानतळ परिसरातील रिक्षा थांब्यावर एक महिला गोंधळ घालत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपी महिला दारूच्या नशेत सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांना शिवीगाळ करत होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही अंमलदार कक्षात महिला मला सोडून द्या म्हणून आरडाओरड करू लागली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांनी महिलेला शांत राहण्यास सांगितले. पण महिलेने त्यांचे केस पकडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागली.

हेही वाचा – आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

हेही वाचा – ठाणे : कोपरी उड्डाणपुलावर आणखी एक मार्गिका सुरू

महिला पोलीस शिपाई प्रियंका कोळी व सुरक्षा रक्षक ज्योती यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता महिलेने हातातील मोबाईल कोळी यांच्या डोक्यावर मारला. तसेच तिने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावाही घेतला. त्यानंतर रुपालीला बेड्या घालण्यात आल्या. कोळी यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला सीआरपीसी कलम ४६ (४) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai drunk woman beat police mumbai print news ssb