मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून अनेक रुग्णांमध्ये श्‍वास घेण्‍यास त्रास, खोकला, घशामध्ये खवखव, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढते प्रदूषण त्यास कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वायू प्रदूषणामुळे विविध ऋतूंमध्‍ये पर्यावरणीय आरोग्‍यविषयक समस्‍या निर्माण होतात. खराब हवेमुळे श्वसनाच्या आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फ्लूसारखा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे श्वास घेण्‍यास त्रास होणे, खोकला, घरघर व छातीत दुखणे यांसारखी लक्षणे जाणवतात. वायू प्रदूषणाबरोबरच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये थंडी अधिक असल्याने मागील काही दिवसांमध्ये फ्लूच्या रुग्णांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखलही करावे लागल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाचे २९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन नाही, नेटफ्लिक्सची उच्च न्यायालयात हमी

खराब हवेच्‍या दर्जाचा व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम होतो. मुंबईतील धुके व वायू प्रदूषणामुळे रूग्‍णांच्‍या संख्‍येत जवळपास २० टक्‍क्यांनी वाढ झाली आहे. अनेक व्‍यक्‍तींना श्‍वास घेण्‍यास त्रास व खोकला अशी लक्षणे जाणवत आहेत. प्रदूषित हवेमुळे फ्लू असलेल्‍या व्‍यक्‍तीला अधिक त्रास होऊ शकतो, अशी माहिती नानावटी मॅक्‍स सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्‍मनरी अँड स्‍लीप मेडिसीनचे संचालक प्रो. डॉ. सलि‍ल बेंद्रे दिली.

लहान मुले व वृद्धांना अधिक धोका

फ्लूची बाधा सर्वच वयोगटातील व्‍यक्‍तींना होते. मात्र पाच वर्षांखालील मुले, गरोदर महिला, ६५ वर्षे व त्‍यापेक्षा अधिक वयाचे नागरिक आणि विविध आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फ्लूची लागण झटकन होण्याचा धोका असतो. प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत मुलांना प्रदूषक व संसर्गांच्‍या प्रतिकूल परिणामांचा धोका अधिक असतो. यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी फ्लूची लस घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : भरवीर ते इगतपुरी समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

काय काळजी घ्याल

घरातून बाहेर पडताना मुखपट्टीचा वापर करा.
वायू प्रदूषण अधिक असल्‍यास घरातच राहावे.
बाहेरून आल्‍यानंतर चेहरा व हात स्‍वच्‍छ धुवावा.
नियमित व्‍यायाम करावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai due to air pollution flu patients increased by 20 to 30 percent mumbai print news css