मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुण्यातील आठ कोटींच्या मालमत्तेवर बुधवारी टाच आणली. सिद्धार्थ अभय चोक्सी आणि अभय सजनलाल चोक्सी यांच्याविरुद्ध काळ्या पैशाच्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आली. टाच आणलेल्या मालमत्तेत करमुक्त बॉन्ड व पुण्यातील जमिनीचा समावेश असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
प्राप्तीकर विभागाने सिद्धार्थ अभय चोक्सी आणि अभय सजनलाल चोक्सी यांच्याविरुद्ध मुंबईतील अतिरिक्त महानगरदंडाधिकारी यांच्या समोर काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर अधिरोपण कायदा, २०१५ अंतर्गत तक्रार केली होती. त्याच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
हेही वाचा : सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ चोक्सी आणि अभय चोक्सी हे ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत ब्लू मिस्ट इंटरनॅशनल इंक या परदेशी संस्थेचे लाभार्थी मालक आहेत. त्याचे सिंगापूरमध्ये बँक खाते होते. या ब्लू मिस्ट इंटरनॅशनलने सिंगापूरमधील एचकेसीएल इन्व्हेस्टमेंट्स लि. सोबत मालमत्ता खरेदीसाठी विक्री व खरेदी करार केला होता. त्याद्वारे सिद्धार्थ चोक्सी आणि अभय चोक्सी यांनी एकूण आठ कोटी ९ लाख इतके अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता कमवली. ती मालमत्ता परदेशात असल्यामुळे देशातील तेवढ्याच किमतीच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.