मुंबई : सांताक्रुझ येथील शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिपायाला अटक केली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. त्याबाबत कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या कुटुबियांना मारण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती.
हेही वाचा : यंदाच्या उन्हाळयात राज्यभर पुरेसा रक्तसाठा
डिसेंबर २०२३ पासून पीडित मुलीवर आरोपी शाळेतील स्टोअर रूममध्ये अत्याचार करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीला धमकावल्यामुळे तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला नाही. पण तिला चालताना त्रास होत असल्यामुळे कुटुंबियांना पीडित मुलीला रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजले. आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली व त्यानंतर धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी बलात्कार, पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर ३९ वर्षीय आरोपीला शाळेतून पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.