मुंबई : मुंबईत ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्री मोठी वाढ होईल अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्राकडून व्यक्त होत होती. दसऱ्यात घरखरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्याअनुषंगाने घरविक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या महिन्यात घरविक्री स्थिर राहिली. ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली. राज्य सरकारला घरविक्रीतील मुद्रांक शुल्काच्या रूपात ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर गेले चार महिने घरविक्रीचे प्रमाण १०,२०० ते १०,९०० च्या दरम्यान होते.
ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर घरविक्री वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, गेले पाच महिने घरविक्री स्थिर आहे. दहा ते अकरा हजारांच्या आसपास घरे विकली जात आहेत. ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून यातून ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला. तर सप्टेंबरमध्ये १०,६९३ घरांच्या विक्रीतून १,१२६ कोटी रुपये महसूल मिळाला होता. ऑगस्टमध्येही घरविक्री अकरा हजाराचा पल्ला पार करू शकली नाही. ऑगस्टमध्ये १०,९०२ घरांची विक्री झाली असून यातून ८१० कोटी रुपये महसूल मिळाला. तर जुलै आणि जुनमध्येही घरविक्री स्थिरच होती. जुलैमध्ये १०,२२१ घरे विकली गेली आणि त्यातून ८३० कोटी रुपये महसूल मिळाला. मेमध्ये मात्र घरविक्री दहा हजारांचा टप्पा गाठू शकली नव्हती. मेमध्ये ९,८२३ घरांची विक्री झाली आणि यातून ८३२ कोटींचा महसूल मिळाला. मात्र या वर्षांतील आतापर्यंतची सर्वात जास्त घरांची विक्री मार्चमध्ये झाली. मार्चमध्ये १३,१५१ घरांची विक्री झाली आणि यातून १,२२५ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले.
हेही वाचा >>>स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका : उमेदवारांच्या बेकायदा बांधकामांची माहिती जनतेला कळणार
आता दिवाळीवर मदार
ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून मागील पाच महिन्यांपासून घरविक्री स्थिर असली तरी मागील दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील घरविक्रीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीत घरांच्या विक्रीचे प्रमाण ४९०० ते ६३०० दरम्यान होते. तर २०२० ते २०२२ या काळात ८००० ते ८५०० इतकी घरविक्री झाली होती. पण यंदा मात्र ऑक्टोबरमध्ये १० हजारांहून अधिक घरे विकली गेली असून ही दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील मोठी संख्या आहे. दरम्यान आता नोव्हेंबरमध्ये दिवाळी असून या काळात घरविक्रीची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.