मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे. परंतु, हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटांवरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीपर्यंत फलाट विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १० ते १३ च्या विस्तारीकरणासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला २०१५-१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या फलाटांची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरने वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम २ जून २०२४ रोजी पूर्ण झाले. या कामामुळे येथून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या चालविणे शक्य होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई कोल्हापूर आणि मुंबई – होसपेटे या एक्स्प्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ करण्याची घोषणा केली. तर, सध्या फलाट क्रमांक १२, १३ चे काम हाती घेण्यात आले आहे. फलाट क्रमांक १२ आणि १३ ची लांबी ३८५ मीटर असून त्यांची लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार, फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले आहे. हे काम पूर्ण झाल्यास साधारणपणे ६ ते ८ रेल्वेगाड्यांच्या डब्यांत वाढ होईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader