मुंबई : तरूणीची अश्लील चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी देऊन रोख रक्कम व सोन्याचे दागिने अशी सुमारे १७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याविरोधात घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात बलात्कार, खंडणी, धमकावणे व गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना: जाहिरात कंपनीच्या माजी संचालकासह दोघांना अटक
२४ वर्षीय पीडित तरूणीला २०२३ मध्ये आरोपीने घरी बोलावले होते. तेथे गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण करून आरोपीने तिला धमकावण्यास सुरूवात केली. समाज माध्यमांवर चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याकडून पैसे मागण्यास सुरूवात केली. घाबरलेल्या पीडित तरूणीने आतापर्यंत रोख पाच लाख रुपये आणि १६ तोळे सोने आरोपीला दिले. पण त्यानंतरही मागणी वाढल्यामुळे अखेर पीडित तरूणीने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून २१ वर्षीय आरोपीविरोधात घाटकोपर पोलिसांनी बलात्कार, खंडणी, धमकावणे व गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.