मुंबई : प्रभादेवी येथील घरावर तोतया सीआयडी अधिकाऱ्याने टाकलेल्या बनावट छाप्यात २० लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. ही रक्कम एका व्यापाऱ्याची असून ती त्याने प्रभादेवी येथे राहणाऱ्या नोकराकडे ठेवायला दिली होती. परिचीत व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण बलाया (२८) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, बलाया हे प्रभादेवी येथील हातिस्कर मार्ग परिसरातील सत्यविजय इमारतीत राहतात. करण रविवारी सकाळी घरी आराम करत असताना एका अनोळखी व्यक्तीने दरवाजा ठोठावला. करणने दरवाजा उघडला असता ती व्यक्ती घरात शिरली व त्याने आपण गुन्हे अन्वेषण विभागातून (सीआयडी) आल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने घरातील सर्व दिवे लावण्यास सांगितले. तसेच घराची झडती घ्यायची असल्यामुळे सर्व सामान खाली काढून ठेवण्यास सांगितले. करणचे मालक व्यापारी राजन जाधव यांनी करणला २० लाख रुपये ठेवण्यासाठी दिले होते.
हेही वाचा : मुंबई: अकरावीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर, ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय
काळ्या रंगाच्या बॅगेतील ती रक्कम करणने कपाटात ठेवली होती. घरात शिरलेल्या त्या व्यक्तीने तीच बॅग उचलली व यात काय आहे विचारले. तक्रारदाराने सर्व माहिती सांगितली ही रक्कम जप्त करावी लागेल, अस तोतया अधिकाऱयाने सांगितले. तसेच मालकाला घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर तोतयाने बॅग उचलली व तो घरातून बाहेर पडू लागला. करणने त्याचा पाठलाग केला असता त्याने त्याला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती व्यक्ती तेथून निघून गेली. करणने हा प्रकार मालकाला सांगितला. त्यानंतर घरात शिरलेली व्यक्ती तोतया असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर करणच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठातर्फे विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव
तक्रारदार करणचे मालक राजन हे व्यापारी असल्यामुळे ते कामानिमित्त फिरत असतात. त्यामुळे त्यांनी ही रक्कम करणकडे ठेवण्यासाठी दिली होती. पण आरोपीला त्याबाबतची माहिती होती. त्यामुळे परिचीत व्यक्तीनेच त्याला माहिती दिल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.