मुंबईः दक्षिण मुंबईतील सराफाच्या कार्यालयात इंटेलिजन्स ब्यूरो, दिल्लीच्या नावाने छापा टाकण्यात आला. आरोपी सोन्याचे रोखीने व्यवहार करत असल्याचे सांगून आरोपींनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्या बदल्यात त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. व्यावसायिकाकडून ११ लाख ५० हजार रुपये घेऊन पळालेल्या चार तोतया अधिकाऱ्यांना २४ तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार सराफ भायखळा येथील घोडपदेव परिसरातील रहिवासी असून त्यांचे भुलेश्वर जवळील दुसरा भोईवाडा परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयात १९ मार्च रोजी चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. त्यांनी आपण इंटेलिजन्स ब्युरो, दिल्ली येथून आल्याचे सांगितले. आरोपींनी कार्यालयातील सर्व टेलिफोन बंद करण्यास सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. पेढीमध्ये रोखीनी व्यवहार होत असल्याची त्यांच्याकडे माहिती असून कायद्यानुसार हा मोठा गुन्हा आहे, असे सराफाला तोतया अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची भीती आरोपींनी दाखवली.

कारवाईपासून वाचायचे असल्यास २५ लाख रुपयांची मागणी केली. सराफाने आपल्याकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगितले. आरोपींनी त्याला धमकावण्यास सुरूवात केली. जीवाच्या भीतीने सराफाने त्यांना ११ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करून रक्कम सुपूर्त केली. ती रक्कम वरिष्ठांना देऊन येतो असे सांगून ते चौघेही बाहेर पडले. त्यानंतर बराच उशीर झाला तरी कोणीच आले नाही. म्हणून सराफाने याबाबतची माहिती घेतली असता तोतया इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी त्यांना लुटल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी याप्रकरणी वि.प. रोड पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३३२(क), ३३३, २०४, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पथके तयार करून तपासाला सुरूवात केली.

सीसी टीव्हीमुळे लागला छडा

सराफाच्या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या चार व्यक्तींची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी केली. त्यात चारही व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी परिसरातील इतर सीसीटीव्हींचे चित्रिकरणही तपासले. त्या माहितीच्या आधारे पवन सुधाकर चौधरी (३३), श्रीजीत मदत गायकवाड (३२), सुर्यकांत शिवाजी शिंदे (३२) व किसन धोंडीबा शेलार (५३) यांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. त्यातील चौधरी हे कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज, गायकवाड नवी मुंबई उलवे, शिंदे वाकोला पूर्व व शेलार गिरगाव येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी वि.प. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत. इतर गुन्ह्यांमध्येही आरोपींचा सहभाग आहे का? याबाबतही तपास सुरू आहे.