मुंबईः पायधुनी येथे पोलीस असल्याची बतावणी करून ३० लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. तक्रारदाराने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी आरोपींना पकडले. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही व्यक्तींचीही फसवणूक केल्याचा संशय असून याबाबत पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुळचे मल्लापुरम येथील रहिवासी असलेले तक्रारदार रमशीद अश्रफ पी. पी. सध्या झकेरिया मशीद स्ट्रिट परिसरात वास्तव्याला आहेत. ते मोबाइलशी निगडीत वस्तूंच्या मार्केटींगचे काम करतात. सिद्धीक यांच्याकडे ते कामाला आहेत. नुकतेच सिद्धीक यांनी त्यांना ३० लाख रुपये दिले होते. दुसर्या दिवशी ही रक्कम त्यांना बँकेत भरायची होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ७ वाजता ते ही रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होते. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी थांबवले. आपण पोलीस असून तुम्हाला पायधुनी पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगून त्यांनी अश्रफला ताब्यात घेतले. त्यापैकी एकाने त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग घेतली आणि तो तेथून निघून गेला. दुसर्या व्यक्तीने त्याला पोलीस ठाण्यात नेण्याचा बहाणा करून चालण्यास सांगितले. काही वेळानंतर तो त्याला काळबादेवीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला.
हेही वाचा : जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी तोतया पोलिसाला पकडून पायधुनी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीचे नाव शफी अलीचेरी हुसैन आहे. शफी केरळमधील रहिवासी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. पळून गेलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव सलीम असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सलीम ३० लाख रुपये घेऊन पळून गेल्याने गुन्ह्यांतील रक्कम अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.