मुंबई: लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे उकळणाऱ्या एका तोतयाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. नदीम चौहान (४८) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा संभाजीनगर येथील रहिवासी आहे. मध्य रेल्वेवरील घाटकोपर – विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी नदीम प्रवाशांना तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत होता.

हेही वाचा : वाणिज्य शाखेच्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ५७ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून २४ दिवसांत निकाल जाहीर

प्रथम श्रेणीच्या डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला नदीमने पकडले. त्याच्याकडे सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट असल्याने आरोपीने त्याच्याकडून १०० रुपये दंड वसूल केला. याच वेळी या डब्यातून रेल्वे सुरक्षा बलाचा एका जवान प्रवास करीत होता. जवानाला नदीमचा संशय आल्याने त्याने त्याची चौकशी केली असता तो तोतया असल्याचे उघड झाले. जवानाने त्याला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात आणले आणि रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader