मुंबई : महिला रेल्वे पोलिसावर अत्याचार करून अश्लील ध्वनीचित्रफीत व छायाचित्र वायरल करण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपीने २०२१ पासून पीडित तरूणीवर वारंवार अत्याचार केला. त्याने तिच्यासोबत लग्नही केले. त्यावेळी २५ वर्षीय तक्रारदार तरूणीचे अश्लील छायाचित्र व ध्वनीचित्रफीत तयार करण्यात आली. त्याद्वारे आरोपीने पीडित तरूणीकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपीचे यापूर्वीही लग्न झाले असून त्या पत्नीनेही पीडित तरूणीला धमकावले. त्यात आरोपीच्या एका मित्राचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीची पत्नी व मित्रानेही तिच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ते दिले नाही, तर पीडित तरूणीचे अश्लील छायाचित्र वायरल करण्याची धमकी दिली. यावेळी मुख्य आरोपीच्या आईनेही महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून नेहरू नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (१), ३५१ (१) (२), ३५२, ६४ (२) (डी), ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून जानेवारी २०२५ पर्यंत सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने मुलुंड, अंधेरी, कल्याण, चेंबूर व लोणावळा अशा विविध ठिकाणी तरूणीवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.