मुंबई : विक्रोळी पार्कसाईट येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भरविण्यात आलेल्या आमदार कबड्डी चषक स्पर्धेदरम्यान पंचानी दिलेल्या निर्णयावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. शुक्रवारी मध्यरात्री २ च्यादरम्यान ही घटना घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

विक्रोळी पार्क साईट येथील लालबत्ती क्रीडा मंडळातर्फे ९ ते १२ एप्रिलदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राम कदम यांच्या नावाने ‘आमदार चषक २०२५’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ११ एप्रिल रोजी रात्री २ वाजता स्पर्धा सुरू असताना पंचानी दिलेल्या निर्णयावरून मैदानात असलेल्या दोन्ही संघामध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.

यावेळी या दोन्ही गटातील खेळाडूंनी मंडपाची मोडतोड केली. तसेच एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण केली. यामध्ये अनेकांना किरकोळ मार लागला. तसेच या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.