मुंबई : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार व सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईत पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास केल्याप्रकरणी १७ लाख ७० हजार कारवायांमध्ये १०७ कोटी रुपये दंड आकारला आहे.
विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, त्यात मृत्युमुखी, तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला सहप्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन यंत्रामध्ये बदल करून वेगळ्या नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे भविष्यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबण्यात येणार आहेत.
हेही वाचा : राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या ६५ टक्क्यांवर, जाणून घ्या, विभागनिहाय पेरण्यांची स्थिती
दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसलेल्या सहप्रवाशांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. यापूर्वीच कायद्यात त्याबाबत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण हेल्मेट न घातलेल्या सहप्रवाशाविरोधात एवढ्या सक्तीने कारवाई केली जात नव्हती. दुसऱ्या बाजूला विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कडक कारवाई केली जात होती. त्याबाबत विशेष मोहिमही राबवण्यात येत होती. मात्र या नव्या सूचनांनंतर सहप्रवाशावरील कारवायाही वाढवल्या जातील.
यावर्षी मुंबईतील कारवायांमध्ये वाढ
मुंबई वाहतूक पोलिसांनी २०२३ मध्ये नऊ लाख ४२ हजार २८४ कारवायांमध्ये ४६ कोटी ९९ लाख ३२ हजार एवढा दंड चालकांवर आकारला आहे. यावर्षी पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र केल्यामुळे २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंतत मुंबई वाहतूक पोलिसांनी ८ लाख २७ हजार ८१२ ई-चलनद्वारे ६० कोटी ९३ लाख ८१ हजार ५०० रुपयांच्या दंडात्मक कारवाया केल्या आहेत. दोन वर्षांमध्ये सुमारे १०७ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.