मुंबई: विक्रोळीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रविवारी पहाटे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले झाले नाही. मात्र रुग्णालयातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेथे दाखल असलेल्या दोन रुग्णांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विक्रोळीतील टागोर नगर परिसरात हे पालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय असून रविवारी पहाटे दोनच्या सुमारास तेथे आग लागली. रुग्णालयातील तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. तेथील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देऊन अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांना बाहेर काढले. मात्र धुरामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा : मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘जय श्रीराम’चा जयघोष, श्री रामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे घेऊन धावपटू धावले

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत काही मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अतिदक्षता विभागातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी अतिदक्षता विभागात सहा रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील दोन रुग्णांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर चार रुग्णांवर तेथेच उपचार सुरू आहेत.