मुंबई : डोंगरी येथील निशाण पाडा मार्गावरील ‘अन्सारी हाईट्स’ या २२ मजली इमारतीत बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत नासिर अन्सारी (४९), समीन अन्सारी (४४) जखमी झाले. तसेच, मदतकार्यादरम्यान अग्निशमन दलातील महिला कर्मचारी अंजली जमदाडे (३५) याही जखमी झाल्या. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डोंगरीत जवळपास तीन तास सुरू असलेल्या अग्नितांडवामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
‘अन्सारी हाईट्स’ या इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका सदनिकेत बुधवारी दुपारी आग लागली. काहीच क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि इमारतीच्या १३ व्या, १४ व्या आणि १८ व्या मजल्यापर्यंत आग पसरली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. रहिवाशांनीही सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, आग आणि पसरलेल्या धुरामुळे अनेकजण इमारतीतच अडकले. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना अग्निशामकांनी सुरक्षितरित्या इमारतीच्या गच्चीवर हलविले. आगीची तीव्रता वाढल्यामुळे अग्निशमन दलातर्फे दुपारी १.१५ च्या सुमारास क्रमांक १ ची वर्दी दिली. दरम्यान, १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत अचानक घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगडोंब उसळला. आगीचे रौद्ररूप पाहून अग्निशमन दलाने दुपारी २.०४ च्या सुमारास आगीला क्रमांक तीनची वर्दी दिली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अग्निशामकांना मतदारकार्यादरम्यान प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या विविध अद्ययावत यंत्रणा दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. दुपारी ३.३० च्या सुमारास अग्निशामकांनी आग नियंत्रणात आणली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा : संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
या दुर्घटनेत नासिर अन्सारी (४९), समीन अन्सारी (४४) होरपळले. तसेच, अग्निशमन दलाच्या महिला कर्मचारी अंजली जमदाडे यादेखील जखमी झाल्या. नासिर अन्सारी व अंजली जमदाडे यांना तात्काळ नजीकच्या जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर समीन अन्सारी या महिलेला उपचारासाठी मसिना रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे. जे आणि मसिना रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.