मुंबई : पवई येथील गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल नजीकच्या साई सॅफायर या २४ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीची तीव्रता सातत्याने वाढत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असून या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

संबंधित बहुमजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागताच रहिवाशांनी तात्काळ इमारतीवर बाहेर पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले.

पोलीस आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने ९ वाजून ५८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध अद्ययावत यंत्रणांच्या साहाय्याने अग्निशामकांचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader