मुंबई : दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली असून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका फटाके व्यवसायाला बसला असून किरकोळ विक्रेते फटाके घेण्यासाठी येतच नसल्याने घाऊक व्यापारी चिंतेत आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची विक्री होते. या काळात फटाके व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र करोनामुळे गेली तीन वर्षे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा एकदा या व्यवसायाला चालना मिळाली आहे. यावर्षी तामिळनाडूमधील शिवाकाशी येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वीच शिवाकाशी येथून विविध राज्यात फटाक्यांची आवक झाली. महाराष्ट्रातील घाऊक व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली आहे.

मुंबई, पुणे, रायगड, वाडा, मुरबाड या परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे घाऊस व्यापारी आहेत. राज्यातील विविध शहरातील किरकोळ व्यापारी दिवाळीपूर्वी महिनाभर आधी फटाके खरेदी करण्यासाठी घाऊक व्यापाऱ्यांकडे येत असतात. मात्र यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परिणामी दिवाळी दहा दिवसांवर आलेली असतानाही किरकोळ विक्रेते अद्याप फटाके खरेदी करण्यासाठी घाऊक व्यापाऱ्यांकडे आलेले नाहीत. त्यामुळे घाऊक व्यापारी चिंतीत झाले आहेत.

हेही वाचा : मुंबई: सर्कससाठी मैदान देण्यास चेंबूरमधील नागरिकांचा विरोध

यंदा शिवकाशीसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा फटाक्याच्या किमती ८ ते १० टक्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र गेले काही दिवस सतत सुरूच असल्याने फटाके खराब होण्याची भीती किरकोळ विक्रेत्यांना आहे. त्यामुळे मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. परिणामी, किरकोळ विक्रेते फटाके खरेदीबाबत आद्यपही संभ्रमात आहेत. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाने काही दिवस विश्रांती घ्यावी, अशी आम्ही देवाकडे पार्थना करत आहोत. या व्यवसायावर अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. पाऊस पडतच राहिला तर सर्वानाच मोठा तोटा सहन करावा लागेल. – सुशील पाटकर, व्यापारी, वाडा-ठाणे

हेही वाचा : मुंबई: वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

आम्ही दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून रस्त्यावर फटाक्यांचा व्यवसाय करतो. मात्र पाऊस पडत असल्याने रस्त्यावर फटाके मांडून त्यांची विक्री करता येत नाही. फटाके भिजल्यास आम्हाला तोटा सहन करावा लागेल. – मनोज ठाणगे, फटाके विक्रेता