मुंबई : रेल्वे रुळांवरून जाणारा पहिला केबल स्टेड उड्डाणपूल मुंबई महानगरपालिका बांधणार आहे. हा पूल पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकाजवळ केशवराव खाडये मार्गावर बांधण्यात येणार आहे. वांद्रे वरळी सी लिंक पुलाप्रमाणे हा केबल आधारित पूल असेल. या पुलाला आधार देण्यासाठी ७८ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महालक्ष्मी स्थानकावरील पुलांच्या बांधकामासाठी टाळेबंदीपूर्वी कंत्राट देण्यात आले होते. डॉ. ई मोझेस मार्गावरून आणि केशवराव खाडये मार्गावरून असे दोन पूल येथे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलावरील भार कमी होण्यास मदत होईल. या दोन पुलापैकी केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. वांद्रे वरळी सागरी सेतू हा केबल आधारित पूल समुद्रातून जातो तर महालक्ष्मी येथील केबल स्टेड पूल हा रेल्वे रुळावरून जाणार आहे.

महालक्ष्मी येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे. तसेच, उत्तरेकडे ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबी घाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी ६३९ मीटर आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणा-या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाच्या संरेखनात बदल केले आहेत.

केबल स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदोज २०० दिवस म्हणजेच ७ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने कायर्वाही केली जाणार आहे. केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे २५० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. हा पूल ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

नवीन पुलामुळे महालक्ष्मी पूर्वेला केशवराव खाडे मार्ग ते पश्चिमेला (सातरस्ता ते महालक्ष्मी रेसकोर्स) दरम्यान थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी महालक्ष्मी स्थानकावरील सध्याच्या पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल व प्रवासाचा वेळ कमी होईल. या नवीन पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाचा मार्ग अंदाजे २०० मीटरने कमी होईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचा खर्चही वाचेल.