मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये हृदय प्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केईएम रुग्णालयाला गुरूवारी मेंदूमृत रुग्णाचे हृदय मिळाले. परिणामी तब्बल ६१ वर्षानंतर केईएम रुग्णालयामध्ये आव्हानात्मक हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यामुळे केईएम हे देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय ठरले आहे. केईएममध्ये उपचार सुरू असलेल्या कल्याण येथील एका महिलेचा मेंदूमृत झाल्याने तिचे हृदय व डोळे दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला. तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून हृदय प्रत्याराेपण करण्यात आले.
कल्याणमधील पत्रीपूल येथे राहत असलेली सई दीपक परब (३४) या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले हाेते. सई परब यांची ही पहिलीच प्रसूती होती. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने स्थानिक डॉक्टरकडे दाखवण्यात आले. मात्र गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे रक्तदाब वाढत असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना औषधे नियमित घेण्याचा सल्ला दिला. मात्र औषधांचे नियमित घेतल्यानंतरही त्यांचा रक्तदाब वाढतच होता. रक्तदाब कमी होत नसल्याने त्यांचे पती दीपक परब यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सई परब यांना बेशुद्ध अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या विविध तपासण्या केल्यानंतर वाढत्या रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मेंदूमृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी दीपक परब यांना सर्व माहिती देत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. ऐरोली येथील एका खासगी कंपनीमध्ये कामाला असलेले आणि ‘कायद्याने वागा’ या लोक चळवळीचे कोकण संघटक असलेल्या दीपक परब यांनी तातडीने अवयव प्रत्यारोपण करण्यास मान्यता दिली. मात्र त्याचवेळी त्यांनी सई यांच्या घरच्यांचीही परवानगी घेतली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर तातडीने प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
हेही वाचा : मुंबई: ट्रॅक मेंटेनरचा लोकलच्या धडकेत मृत्यू
केईएम रुग्णालयामध्ये हृदयविकाराने त्रस्त असलेल्या औरंगाबाद येथील एका रुग्णावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याचे प्राण वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. परंतु दाता उपलब्ध नसल्याने बऱ्याच दिवसांपासून हृदय प्रत्यारोपण रखडले होते. दीपक परब यांनी त्यांच्या पत्नीचे हृदय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तातडीने हृदय प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया सुरू केली. हृदय दाता आणि रुग्ण दोघांचेही रितसर समुपदेशन केल्यानंतर ११ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची तब्येत स्थिर आहे. हृदय प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण कुलकर्णी, हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सर्व डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक, समुपदेशक आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी कौतुक केले. हृदय प्रत्यारोपणासारखी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरू करणारे केईएम हे भारतातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय ठरले आहे. केईएम रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात येत आहे.
१९६३ मध्ये पहिला अयशस्वी प्रयत्न
केईएम रुग्णालयामध्ये १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या पुढाकारामुळे केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी केईएम रुग्णालयाल तात्पुरता परवाना मिळाला. त्यानंतर डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा : मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
हृदय प्रत्यारोपणासाठी ८ लाख रुपये खर्च
हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात साधारण ३५ लाख रुपये खर्च येतो. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये अवघ्या ८ लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात येते. महानगरपालिकेच्या पुढाकाराने हा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून केला जातो.
यकृत प्रत्यारोपण उपक्रमासाठीही महानगरपालिकेचा पुढाकार
केईएम रुग्णालयात २०१० मध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे २०१८ पासून त्या बंद झाल्या होत्या. मात्र जानेवारी २०२४ पासून यकृत प्रत्यारोपणातील तज्ज्ञ डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई: सीएसएमटी येथे कार्यालयीन इमारतीचा छज्जा स्टाॅलवर पडला
चार वर्षांत सरकारी रुग्णालयातून फक्त दोनदाच अवयवदान
अवयवदानाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. चार वर्षांमध्ये १५७ दात्यांनी अवयवदान केले आहे. मात्र या चार वर्षांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये फक्त दोन वेळाच अवयवदान झाले आहे. याउलट खासगी रुग्णालयांमध्ये १५५ दात्यांनी अवयवदान केले आहे.