मुंबई : यंदा कृषी अभ्यासक्रमाची चार तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एक अशी एकूण पाच नवी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या ३७७ नव्या जागा वाढल्या आहेत. कृषी शिक्षणातील अन्य अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये घट झाल्याने कृषी शिक्षणाच्या एकूण १५६ जागा वाढल्या आहेत. कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. मागील काही वर्षापासून बी.एस्सी कृषी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता राज्यामध्ये कृषी अभ्यासक्रम शिकविणारी चार नवी महाविद्यालये यंदा सुरू करण्यात आली आहेत. कृषी अभ्यासक्रमाची तीन अनुदानित तर, एक विनाअनुदानित चार महाविद्यालये सुरू करण्यात आल्याने जागा वाढल्या आहेत.

हेही वाचा : मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, विस्थापित १६९४ पैकी १०२९ रहिवासी पात्र

कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एक महाविद्यालय सुरू करण्यात आल्याने ६० जागा वाढल्या. त्याचवेळी विनाअनुदानित महाविद्यालयातील तुकड्या कमी झाल्याने १२० जागा कमी झाल्या. त्यामुळे महाविद्यालय सुरू झाले तरी ६० जागा कमी झाल्या आहेत.