मुंबई : दिवाळीनिमित्त मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फराळ जिन्नस यांना प्रचंड मागणी असते. ही संधी साधून काही मंडळी या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून कठोर पावले उचलली आहेत. पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, साकीनाका आणि बोरिवली येथे भेसळ करणाऱ्यांविरोधात आक्रमक कारवाई करून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध, मावा, सूर्यफूल आणि पामोलिन तेल जप्त करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ करण्याची दाट शक्यता असते. अन्नपदार्थाची गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेला सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील संभाजी नगरमधील दुधविक्रेता साईदुळू मल्लेशवर कारवाई करून अमूल कंपनीचे ५ हजार ७९८ रुपये किमतीचे १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट ८ सोबत केली. त्याचप्रमाणे बोरिवली पूर्व येथील ब्रिजवासी मावावाला या दुकानावर ४ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. यावेळी किरकोळ विक्रीसाठी ठेवलेले गोकुळ कंपनीचे तूप आणि ५२ हजार २७० रुपयांचा २०९ किलो मावा जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान अन्नपदार्थांवरील वेष्टनात फेरफार, अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले.

हेही वाचा : सोने-चांदी व्यावसायिकांच्या चार भट्टी व धुरांड्यांवर हातोडा; वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची कारवाई

साकीनाका येथील अरबाज बरादिया यांच्या मालकीच्या मे. प्रगती ऑईल मिलवर टाकलेल्या छाप्यात १ लाख ७ हजार १२० रुपये किमतीचे रिफाईन सूर्यफूल तेल, पामोलिन तेल जप्त करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे तेल आणि अस्वच्छता असल्याचे यावेळी आढळून आले. तसेच ३ नोव्हेंबर रोजी साकीनाका येथील मे. मंगलदीप फूड्सवर टाकलेल्या छाप्यात ५ हजार २६५ रुपयांचे ५८ किलो पामोलिन जप्त करण्यात आले. या तेलाचा पुनर्वापर करण्यात आल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र आढाव आणि सहाय्यक आयुक्त आर. डी. पवार, ए. एन. रांजणे, डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक के. वाय. चिपळूणकर, जी. एम गायकवाड या कारवाईच सहभागी झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai food and drug administration seized adulterated milk mawa sunflower and palmoline oil ahead of diwali festival mumbai print news css