मुंबई: कांदिवलीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी धाड टाकण्यासाठी पोहोचले. मात्र काही वेळातच स्थानिक गुंड तसेच तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यांना घेरुन बाचाबाची सुरु केली. प्रकरण हातघाईवर येण्याचे चित्र निर्माण झाले आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करता परतावे लागले… अशा घटनांचा सामना गेल्या वर्षभरात एफडीएच्या अधिकाऱ्यांना अनेकदा करावा लागला आहे. तरीही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्याचा निर्धार एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे.
तरुण पिढीच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्यात २०१२पासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही शाळा कॉलेजच्या परिसरातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व पान मसाला सहज मिळताना दिसतो. पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाला या बेकायदा गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार असले तरी या दोन्ही यंत्रणांमध्ये सुसंवाद अभावानेच आढळून येतो. काही प्रकरणात एफडीए च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे सहकार्य मागितले असता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून चहापान करवले व नंतर पोलीस घेऊन ते कारवाईसाठी संबंधित दुकानात गेले असता काहीही हाती लागले नाही. याचा अर्थ कोणीतरी कारवाईची माहिती आधिच दिली असणार असे एफडीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. बहुतेकवेळा एफडीएचे अधिकारी कारवाईसाठी जातात तेव्हा स्थानिक गुंड तसेच राजकीय कार्यकर्ते वा नेते येऊन अडथळा आणतात. परिणामी अनेकदा प्रभावी कारवाई करता येत नाही असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : मुंबई : तासाभरात सर्वाधिक पाऊस कुर्ला परिसरात
यातील खरी गोम म्हणजे एफडीएकडे आजघडीला कारवाईसाठी पुरेसे अधिकारी व कर्मचारी नाहीत. अन्न निरीक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. तसेच कारवाई केल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक असते त्यासाठी लिपिक नाहीत तसेच टंकलेखही नाहीत. परिणामी पुरेशा सुरक्षेशिवाय स्वतः च्या जीवावर उदार होऊन कारवाई करायची आणि नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करत बसायचे. यातूनच अधिकारीही कारवाईबाबत उदासिनता बाळगून असतात.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मोठ्या प्रमाणात अन्न व औषध निरीक्षक तसेच कर्मचारी भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत गुटख्यावरील कारवाई आम्ही थांबू देणार नाही, असे अभिमन्यू काळे यांनी सांगितले. १ एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात गुटखा कारवाईसाठी एकूण १४९४ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून यात ८५१ जणांवर अफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर ३० कोटी २४ लाख ९४८ रुपयांचा गुटखा वा तत्सम पदार्थ जप्त करण्यात आल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले. १ एप्रिल २४ ते १४ जून २४ पर्यंत एकूण २१८ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून १२७ लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय १०५ दुकांनाना टाळे ठोकण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : Mumbai Rain Alert: मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली
देशात दरवर्षी कर्करोगाने ५२ हजार लोकांचा मृत्यू होतो तर दरवर्षी ७७ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होत असून यातील बहुतेकजण तंबाखू वा गुटखा सेवन करणारे आहेत. प्रामुख्याने तरुणांमध्ये गुटखा वा तत्सम पदार्थ खाण्याची सवय मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने शाळा कॉलेजच्या परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर निर्दयपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे अभिमन्यू काळे यांनी सांगितले.