मुंबई : येत्या बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असून मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्याच्या प्रक्रियेला २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता मंडळांना २६ ऑगस्टपर्यंत मंडप परवानगीसाठी अर्ज करता येईल.
हेही वाचा… ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२२’ : यंदा ‘मुंबईचा राजा’ कोण?
मुंबईमधील रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेकडून मंडप उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पूर्वीप्रमाणेच मंडप परवानगीची प्रक्रिया सुरू केली होती. मंडप परवानगीसाठी २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत प्रशासनाने मंडळांना दिली होती.
मात्र ही मुदत वाढवावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि काही सार्वजनिक गणेशोत्व मंडळांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने मंडळांना मंडप परवानगीसाठी २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मंडळांना मंडप परवानगीसाठी अर्ज करता येईल, असे उपायुक्त (परिमंडळ-२) तसेच सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी सांगितले.