मुंबई : गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला मुलुंड परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलुंडमधील वैशाली नगर परिसरात गुन्हे शाखा ‘परिमंडळ ७’चे अधिकारी मंगळवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी एका मोटारगाडीत तीन ते चारजण पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसले.
हेही वाचा : लेझर प्रकाशझोत ग्रहणातील सूर्यकिरणांइतका घातक, सार्वजनिक लेझर वापरावर बंदीची गरज
पोलिसांनी काही अंतरावर ही गाडी थांबवली आणि झडती घेतली असता गाडीमध्ये काही गोणी आढळल्या. पोलिसांनी या गोणींची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये किमतीचा ६० किलो गांजा आढळला. पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चारही आरोपींविरूद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना मुलुंड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मोशीम शेख (३५), रहीम खान (४२), रोहीत भालेराव (२६) आणि राकेश गायकवाड (२७) अशी या अटक आरोपींची नावे असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.