मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी सोमवारी रात्री १२.३० ते मंगळवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्या असून काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विरारला जाणारी शेवटची चर्चगेट-विरार लोकल रात्री ११.२७ वाजता चर्चगेट स्थानकातून सुटेल. त्यानंतर चर्चगेट अंधेरी ही रात्री १ वाजताची शेवटची लोकल असेल.
ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर अप आणि डाऊन मेल, एक्स्प्रेस अंदाजे १० ते २० मिनिटे उशिरा धावतील. या ब्लॉकमुळे ३० सप्टेंबर रोजी रात्री चर्चगेट स्थानकातून ११.२७ वाजता सुटणारी चर्चगेट ते विरार लोकल विरारला जाणारी शेवटची लोकल असेल. ही गाडी विरार येथे मध्यरात्री १.१५ वाजता पोहोचेल. तर, चर्चगेट ते अंधेरी लोकल चर्चगेटहून रात्री १ वाजता शेवटची लोकल सुटेल.
तसेच विरारहून चर्चगेटसाठी रात्री ११.३० वाजता शेवटची लोकल सुटेल. बोरिवलीहून चर्चगेटसाठी रात्री १२.१० वाजता शेवटची लोकल सुटेल. गोरेगाव ते सीएसएमटी या मार्गावर गोरेगावहून रात्री १२.०७ वाजता शेवटची लोकल सुटेल. मंगळवारी पहाटे अतिरिक्त लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यात विरारहून बोरिवलीदरम्यान रात्री ३.२५ वाजता धीमी लोकल चालविण्यात येईल. ही लोकल बोरिवलीला पहाटे ४ वाजता पोहोचेल. बोरीवली ते चर्चगेट या मार्गावर धीमी लोकल बोरिवलीहून पहाटे ४.२५ वाजता सुटेल. ही लोकल अतिरिक्त लोकल म्हणून चालविण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.