मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे खराब होत असलेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढत्या प्रदुषणाचा परिणाम मुंबईतील पाचपैकी चार कुटुंबांना त्रास होत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे ‘लोकस सर्कल’ या संस्थेने मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याबाबत सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणात सात हजार मुंबईकर सहभागी झाले होते. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६७ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३३ टक्के इतके होते. सर्वेक्षणामध्ये सहभागी नागरिकांपैकी ७८ टक्के नागरिकांना प्रदुषणामुळे घशामध्ये खवखव, खोकला होत असल्याचे, तर ४४ टक्के नागरिकांना डोळे चुरचुरणे, ३९ टक्के नागरिकांनी सर्दी, २८ टक्के नागरिकांनी दमा, १७ टक्के नागरिकांनी डोकेदुखी आणि २२ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश नागरिक हे प्रदुषणामुळे आजारी पडत असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
हेही वाचा : तरुणाचे अपहरण करून १० हजार रुपये लुटले; एक आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू
मुंबईमधील वाढत्या प्रदुषणाला रस्ते, इमारतींचे बांधकाम कारणीभूत असल्याचे ८५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. गाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६२ टक्के, औद्योगिकरणामुळे ३८ टक्के, झाडूने रस्त्यांची साफसफाई करण्यात येत असल्याने प्रदुषण होत असल्याचे ३१ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. डिझेल जनरेटरमुळे १५ टक्के, तर अन्य कारणांमुळे प्रदूषण होत असल्याचे मत ३१ टक्के नागरिकांनी व्यक्त केले.
हेही वाचा : मुंबईतील घर, कार्यालयांमध्ये चोरी करणारी गुजरातमधील महिलांची टोळी गजाआड
मुंबईतील प्रदुषणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी २५ टक्के नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करीत असल्याचे सांगितले. १७ टक्के नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच पोषक आहारावरही भर देत असल्याचे सांगितले. तर मुखपट्टी, पोषक आहाराबरोबरच घरामध्ये हवा शुद्धीकरण यंत्र बसविल्याचे आठ टक्के नागरिकांनी सांगितले. उरलेल्या ५० टक्के नागरिकांनी प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी काहीच वापरत नसल्याचे सांगितले.