मुंबई: घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीतील एका जुन्या पाण्याच्या टाकीत बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सचिन वर्मा (८) असे या मुलाचे नाव असून तो घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात राहत होता. सचिन शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास येथील शांतीनगर परिसरात खेळत होता. यावेळी तेथील एका जुन्या पाण्याच्या टाकीत तो पडला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी तत्काळ याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.
आसपासच्या नागरिकांनी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.