मुंबई : तीन महिन्यांपूर्वी बाळ झाल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र घाटकोपर दुर्घटनेमुळे सोमवारी यादव आणि पासवान कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या दोन्ही कुटुंबातील नवजात बालकांचे पित्याचे छत्र हरपले. अंधेरी एमआयडीसी येथे राहणारे दिलीप पासवान (३०) हे ऑप्टिकल फायबर अभियांत्रिक म्हणून पीजीसीआय कंपनीत कामाला होते. सोमवारी बीएआरसी येथील काम आटपून ते भांडुप येथे गाडीने जात होते. यावेळी गाडीमध्ये वाहनचालक, सहाय्यक व ते असे तिघे होते.
पेट्राेल भरण्यासाठी ते पंपावर गेले होते. त्याच वेळी महाकाय फलक कोसळले. गाडीतून वाहनचालक व सहाय्यकाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र दिलीप पासवान गाडीतच अडकले होते. त्यांना काढणे अवघड झाले होते. रात्री २.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला. त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दिलीप पासवान यांना पाच वर्षांची आणि सात वर्षांची अशा दोन मुली असून, चार महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र घाटकोपर दुर्घटनेने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, चार महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाचे छत्र हरपले.
हेही वाचा : संयमाची कसोटी… तळपते ऊन, कोंदट वातावरणात एनडीआरएफच्या जवांनाची अविरत सेवा
पोट भरण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेला सचिन यादव (२३) शीव कोळीवाडा येथे वास्तव्यास होता. सचिन यादव घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर कामाला होता. तो सोमवारी नियमितपणे काम करत होता. त्याचवेळी दुर्घटना घडल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला. सचिनच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व अवघ्या ३ महिन्यांचे बाळ असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले हाते.