मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांना देवनार कचराभूमीकडील भागात तडे गेल्याचे निदर्शनास येताच महानगरपालिकेने सावध भूमिका घेतली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित भागाची नुकतीच व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ज्ञांनी तांत्रिक तपासणी पूर्ण केली. उड्डाणपुलाखाली भूमिगत गटारासाठी खोदलेल्या खड्यामधील पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने उड्डाणपुलाच्या पायाच्या भिंतीखालील माती वाहून गेल्याने सुरक्षा कठड्यांना तडे गेल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. संबंधित भागातील भराव अधिक खचू नये, यासाठी त्याला लोखंडी खांबांद्वारे बळकटी देण्याची शिफारस तज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने एम पूर्व विभागातील घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपुलाचे काम ३० जुलै २०२१ रोजी पूर्ण केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद््घाटन झाल्यांनतर १ ऑगस्ट २०२१ रोजी उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला होता. संबंधित उड्डाणपुलावर देवनार कचराभूमीकडील मार्गिकेच्या भागातील सुरक्षा कठड्यांना तडे आणि रस्त्यावर भेगा पडल्याचे वृत्त १० एप्रिल रोजी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेले सुरक्षा कठडे बाहेरील बाजूस कलले असून कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीती आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहतुकीसाठी मार्ग खुला होऊन चार वर्षेही पूर्ण झालेली नसताना सुरक्षा कठड्यांना तडे गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भिंत खचल्याच्या भागाची तांत्रिक सल्लागारांकडून पाहणी करण्यात आली. तसेच व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ज्ञांनीही संबंधित उड्डाणपुलाची तांत्रिक तपासणी केली. उड्डाणपुलालगतच्या कचरा डेपो रस्त्यावर भूमिगत गटाराचे काम सुरू आहे. भूमिगत गटारासाठी खोदलेल्या खड्यामधील पाण्याचा उपसा करण्यात येत असल्यामुळे उड्डाणपुलाच्या पायाच्या भिंतीखालील माती वाहून गेली. त्यामुळेच भिंतीच्या काही पॅनल्सना आणि पुलाच्या सुरक्षा कठड्याला तडे गेल्याचे पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. संबंधित भागाची दुरुस्ती होईपर्यंत मार्गिकेवरील वाहतूक अवजड वाहनांकरिता नियंत्रित करण्यात यावी, भूमिगत गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्याचा निचरा विशिष्ट उंचीपर्यंत नियंत्रित करावा तसेच, खड्ड्यातील पाण्याच्या उपशामुळे भराव अधिक खचू नये यासाठी रस्त्याचेही लोखंडी खांबांद्वारे बळकटीकरण करण्यात यावे या तीन शिफारसी व्ही.जे.टी.आय संस्थेच्या तज्ञांनी महापालिकेला केल्या आहेत.

दरम्यान, उड्डाणपुलाच्या बाधित भागाची दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पुलाखालील रस्त्यावरून सुरू ठेवण्यात येणार आहे. भूमिगत गटाराचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाच खचलेल्या भरावाची व कठड्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत. दुरुस्तीनंतर संबंधित मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.