मुंबई : चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या तब्बल २२ लाख रुपये किंमतीच्या मोबाइलचा शोध घेण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले असून घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी तब्बल १६५ तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाइल परत केले. मोबाइल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. गेल्या ११ महिन्यात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना, तसेच रस्तावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांचे मोबाइल चोरीला गेले होते. तर काहींचे मोबाइल हरवले होते.
हेही वाचा : चेंबूरमध्ये विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू
याप्रकरणी अनेकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन घाटकोपर पोलिसांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी विविध ठिकाणी शोध घेऊन १६५ मोबाइल हस्तगत केले. या सर्व मोबाइलची किंमत २२ लाख रुपये आहे. घाटकोपर पोलिसांनी तत्काळ संबंधित तक्रारदारांशी संपर्क करून मंगळवारी या तक्रारदारांना त्यांचे मोबाइल परत केले. यामध्ये महागड्या मोबाइलचाही समावेश असून मोबाइल मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.